मुंबई. Deool Band 2 Box Office Collection: 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' (Deool Band) चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) सिनेमालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 'देऊळ बंद'च्या या सीक्वेलनं रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांना थिएटर्सकडे खेचून आणलं आहे. श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारे मोहन जोशी यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या चित्रपटाने अवघ्या 12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर आपला डंका वाजवला आहे.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडी रिपोर्टनुसार, दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजेच सोमवारी या सिनेमानं मोठी कमाई केली आहे. 12 व्या दिवशी या सिनेमानं 2 कोटी 60 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. 12 दिवसांत या सिनेमानं 50 कोटींचा आकडा पार केला आहे. 'देऊळ बंद 2' हा सिनेमा अवघ्या 10 कोटी रुपयात तयार झाला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या चित्रपटाने बजेटच्या तब्बल ४०० टक्के कमाई केली आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक ठिकाणी थिएटरमध्ये चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थांचे भक्त आणि मराठी चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपट प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी म्हणजे सोमवारी 'देऊळ बंद 2 'ने सुमारे 2.60 कोटी रुपयांची कमाई केली. याआधी 9 व्या दिवशी 3.10 कोटी, 10 व्या दिवशी 5 कोटी आणि 11 व्या दिवशी 5.75 कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमवला होता. या चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 46.65 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून, ग्रोस कलेक्शन 54.88 कोटी रुपये झाल्याची माहिती समोर आली आहे. देऊळ बंद 2 चे राज्यात दररोज पाचशेहून अधिक शो सुरू आहेत.
