जेएनएन, मुंबई: देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘क्राइम पेट्रोल’ ही लोकप्रिय मालिका आता मराठी भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘क्राइम पेट्रोल मराठी’ या नव्या मालिकेचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये करणार आहेत. ही मालिका २६ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सोनी मराठी आणि Sony LIV या माध्यमांवर प्रसारित होणार आहे.

गुन्हेगारी घटनांबाबत जनजागृती करणे, नागरिकांमध्ये सतर्कतेची भावना निर्माण करणे आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या मालिकेचा मुख्य उद्देश आहे. ‘चुकीच्या विचारांना करा DELETE आणि चांगले विचार करा VIRAL, कारण आता जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच!’ हा संदेश घेऊन ही मालिका प्रेक्षकांना दैनंदिन जीवनात अधिक सजग राहण्याचे आवाहन करणार आहे.

सत्य घटनांवर आधारित कथांच्या माध्यमातून विविध गुन्ह्यांचा वेध घेताना धोक्याचे संकेत वेळीच ओळखणे, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहणे, योग्य प्रश्न विचारणे आणि कोणावरही विश्वास ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेणे, यांचे महत्त्व या मालिकेतून अधोरेखित केले जाणार आहे. तसेच विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरजही प्रेक्षकांना पटवून दिली जाणार आहे.

या मालिकेशी जोडले गेल्याबद्दल उपेंद्र लिमये यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “एक अभिनेता म्हणून कथांचा लोकांच्या मनावर किती प्रभाव पडू शकतो, हे मी पाहिलं आहे. ‘क्राइम पेट्रोल मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि सतर्क राहायला प्रोत्साहित करण्याचा माझा प्रयत्न असेल. आज कोणतीही गोष्ट काही क्षणांत व्हायरल होते. अशा वेळी जनजागृती करणारे संदेश आणि चांगले विचारही लोकांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. सोनी मराठीसोबत हा संदेश पुढे घेऊन जाताना मला आनंद होत आहे. कारण अधिक सुरक्षित समाज घडवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.”

गुन्हेगारी घटनांमधून मिळणारे धडे, सतर्कतेचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी ‘क्राइम पेट्रोल मराठी’ ही मालिका प्रेक्षकांसाठी जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरणार आहे.

‘क्राइम पेट्रोल मराठी’ पाहा २६ ऑक्टोबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता, सोनी मराठी आणि Sony LIV वर.

हेही वाचा: हॉलिवूडमध्ये जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी चुरस; दोन अभिनेत्यांची नावे आघाडीवर