जेएनएन, मुंबई: मराठी रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांना त्यांच्या ‘लापता लेडीज (Laapataa Ladies)’ या चित्रपटातील अप्रतिम भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक मोठा टप्पा मानला जात आहे.

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ग्रामीण भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक हृदयस्पर्शी कथा सांगतो. छाया कदम यांनी या चित्रपटात ‘मंजु देवी’ ही भूमिका साकारली असून, त्यांच्या सशक्त आणि वास्तववादी अभिनयाने प्रेक्षक तसेच समीक्षकांची मने जिंकली आहेत. पुरस्कार स्वीकारताना छाया कदम भावूक झाल्या. त्यांनी सांगितले, “माझ्या आयुष्यातील हा क्षण अविस्मरणीय आहे. मी अभिनयाची सुरुवात रंगभूमीवरून केली आणि आज फिल्मफेअरच्या मंचावर उभी आहे, हे माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखे आहे.”

या पुरस्कार समारंभात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांनी स्वतः छाया कदम यांना ट्रॉफी प्रदान केली. त्यावेळी घडलेला क्षण विशेष ठरला. शाहरुख खान यांनी मंचावर त्यांच्या अभिनयाची प्रशंसा करताना उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि स्वतः त्यांच्या हातात पुरस्कार दिला. हे छाया कदम यांच स्वप्न होत आणि ते पूर्ण झालं अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. हा क्षण पाहून उपस्थितांनीही छाया कदम यांचे कौतुक केले. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, “हा मराठी अभिमानाचा क्षण आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

छाया कदम यांनी यापूर्वी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नायराशा’, ‘गुलाबजाम’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘जवान’ आणि ‘थ्री ऑफ अस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून त्यांचा अभिनयाचा गडद अनुभव आणि प्रामाणिकपणा झळकतो. ‘लापता लेडीज’मुळे त्यांना मिळालेला हा फिल्मफेअर पुरस्कार केवळ वैयक्तिक यश नाही, तर मराठी कलाकारांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.

हेही वाचा: Filmfare Awards 2025: लक्ष्य आणि नितांशी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार, तर झीनत अमान यांना जीवनगौरव पुरस्कार