मुंबई. Raigad Accident : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ १५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 तरुणांना जीव गमावावा लागला. या घटनेमुळे साताऱ्यासह रायगडमध्ये शोककळा पसरली. या आठ जणांपैकी सात जण साताऱ्यातील होते, तर एक जण हा रत्नागिरी जिल्ह्यातील होता.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ जवळपास दीड हजार फूट दरीत कोसळून आठ तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी झाला होता. या अपघातात २५ वर्षीय मराठी अभिनेत्याचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अप्पी आमची कलेक्टर मालिकेत काम केलेला अभिनेता महेश पवारचा आंबेनळी घाटात मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी महेशने जगाचा निरोप घेतला आहे.

आदित्य साळुंखे (वय 21), महेश पवार (25), रितेश लोखंडे (21), सुहास लोखंडे (19), अंश चव्हाण (19), निखिल शिंगटे (21), संदीप काटकर (35), उत्कर्ष शिंगटे (21) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

यातील महेश पवार हा उद्योन्मुख मराठी अभिनेता होता. त्याच्या मृत्यूच्या बातमीने मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. त्याने अप्पी आमची कलेक्टर या प्रसिद्ध मालिकेत काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र सध्या त्याच्याकडे काम नसल्याने त्याची धडपड सुरू होती.

वाढदिवस साजरा करायला गेला अन् काळाने घातली झडप -

    महेश पवार हा साताऱ्यातील आसगाव येथे कुटुंबासह राहत होता. शुक्रवारी महेशचा वाढदिवस होता. बर्थडे सेलिब्रेशनसाठी तो मित्रांसह कोकणातील हर्णे बंदर येथे गेला होता. शनिवारी रात्री कोकणातून साताऱ्यात परतत असतानात रायगडमधील आंबेनळी घाटात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. महेशसोबत त्याच्यासोबत फिरायला गेलेल्या आठही मित्रांचा मृत्यू झाला आहे.

    पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढले. या अपघातात गाडीतील कोणीही वाचले नाही.