जेएनएन, मुंबई: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील '370 की बिर्याणी' या वादग्रस्त टिप्पणीची चर्चा अजूनही सुरू असताना आता सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वाळवलकर हिनेही या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत तिने केवळ संबंधित घटनेवरच नव्हे, तर समाजाच्या बदलत्या भूमिकेवरही भाष्य केले आहे.

अंकिता वाळवलकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "प्रणित मोरेच्या शोमध्ये जे घडलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. मुलींवर असो किंवा मुलांवर, अशा प्रकारे सार्वजनिकपणे बोलणं चुकीचंच आहे." मात्र, अशा प्रकारचे स्वस्त विनोद केवळ एका व्यक्तीकडून होत नसून अनेकजण ते करत असल्याचेही तिने नमूद केले.

तिने यावेळी कॉमेडियन समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादांचाही संदर्भ दिला. "त्या वेळीही प्रचंड ट्रोलिंग, पोलिस तक्रारी आणि टीका झाली. पण काही काळानंतर तेच लोक पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आपणच त्यांच्या कमबॅकचे स्वागत केले," असे ती म्हणाली.

अंकिताने समाजाच्या सामूहिक स्मरणशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, "आपण चुकीचा निषेध करतो, पण तीच चूक मनोरंजनाच्या नावाखाली पुन्हा स्वीकारतो. व्यक्ती बदलतात, वाद बदलतात; पण प्रेक्षक म्हणून आपली भूमिका मात्र तशीच राहते."

याशिवाय तिने लावणी कार्यक्रमांच्या संदर्भातही भाष्य केले. एका वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याची पोस्ट पाहिल्याचा उल्लेख करत तिने पालकांच्या निवडी आणि समाजातील मूल्यांवर प्रश्न उपस्थित केले. "ज्याला जे आवडतं ते करू द्या हा विचार ऐकायला उदार वाटतो. मात्र समाजातील प्रत्येक गोष्ट केवळ वैयक्तिक आवडीवर सोडून चालत नाही. आपल्या निवडींचा परिणाम पुढच्या पिढीवर आणि सामाजिक मूल्यांवरही होत असतो," असे ती म्हणाली.

पोस्टच्या शेवटी अंकिता वाळवलकरने समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली. "फक्त बोट दुसऱ्याकडे दाखवून उपयोग नाही. आरशात स्वतःकडे पाहण्याची तयारीही समाजाने ठेवायला हवी. कारण कलाकार रंगमंचावर असतो, पण त्या रंगमंचाला टाळ्या देणारे आपणच असतो," असे तिने नमूद केले.

    दरम्यान, '370 की बिर्याणी' प्रकरणानंतर सोशल मीडियावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनोदाची मर्यादा आणि प्रेक्षकांची जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

    हेही वाचा: 'बिर्याणी ऑफ 370' वादात अडकला प्रणित मोरे! आता कामेडियनच्या समर्थनार्थ पुढे आला हा अभिनेता, म्हणाला कॉमेडीबद्दल…