जेएनएन, मुंबई: अभिनेत्री आणि निर्माती मेधा मांजरेकर यांनी प्रथमच सोशल मीडियावर आपल्या कर्करोगाशी झालेल्या लढ्याबाबत खुलासा केला आहे. उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत असताना त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत या कठीण काळात मिळालेल्या कुटुंबीय, मित्र आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मेधा यांनी पोस्टमध्ये सांगितले की, हा प्रवास त्यांच्या आयुष्याला नव्याने घडवणारा ठरला. कर्करोगाचे निदान, शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन या उपचारांच्या आठवणींपेक्षा या काळात मिळालेल्या प्रेमाने आणि ईश्वरी कृपेने त्यांना अधिक बळ दिले.
"लोक मला विचारतात की, तू यातून कशी सावरलीस? माझे उत्तर एकच आहे—मी हा प्रवास कधीच एकटीने केला नाही," असे त्यांनी लिहिले. प्रत्येक कठीण क्षणी देवाने वेगवेगळ्या रूपांत मदतीचा हात पुढे केला. कधी गुरू, कधी डॉक्टर-नर्सेस, तर कधी कुटुंबीय आणि मित्र यांच्या माध्यमातून देवानेच साथ दिली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मेधा यांनी आपल्या मुलींविषयीही भावनिक शब्दांत लिहिले. "एक आई कायम मुलांचा हात धरून चालते, पण आयुष्यात एक क्षण असा येतो, जेव्हा मुलंच आईचा हात धरतात," असे म्हणत त्यांनी मुलींनी दिलेल्या आधाराबद्दल आभार मानले.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. "महेश... फक्त माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद," असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
उपचारादरम्यान मित्रांनी केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींनी मोठा आधार दिल्याचेही त्यांनी सांगितले. आवडीचे पदार्थ आणणे, घरी येऊन वेळ देणे, प्रार्थना करणे, हसवणे आणि कठीण दिवसांत सोबत राहणे, या प्रत्येक कृतीमुळे हा लढा अधिक सोपा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
हेही वाचा: सह-अभिनेत्रीचा पाठलाग आणि छळ केल्याचा आरोप, टीव्ही अभिनेता रोहित चंडेलला न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा
