जेएनएन, मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू झालेला राजकीय वाद आता मनोरंजन क्षेत्रातही पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रकल्पावर टीका करणाऱ्यांबाबत केलेल्या 'भाड्याचे टट्टू' या वक्तव्यावर अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पाच्या परिसरात झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर विरोधकांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काही जण सोशल मीडियावर पैसे घेऊन सरकारविरोधात वातावरण तयार करत असल्याचा आरोप करत त्यांचा उल्लेख 'भाड्याचे टट्टू' असा केला. या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "कल्पना करा की एखादा मुख्यमंत्री प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना 'भाडे के टट्टु' म्हणतो, म्हणजे पेड टेस्टिकल् आधी आम्ही झुरळे, आता टट्टु, समोर काय होईल नवीन अपमानचा विचार करा. 

यापुढे त्यांनी सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नसल्याचे स्पष्ट करत त्या म्हणाल्या, "आणि तसे पाहता, महोदय, कारभारावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करणे नव्हे; तुम्ही स्वतः महाराष्ट्र नाही आहात, तर महाराष्ट्राचा कारभार पाहण्यासाठी तुमची निवड झाली आहे. हा फरक समजून घ्या.असेही म्हटले आहे.

कुनिका सदानंद यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, तर काहींनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे हा वाद आता केवळ राजकीय न राहता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्प, त्यावरील दरड कोसळण्याची घटना आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेले वक्तव्य यावरून राज्यातील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले असून, विविध क्षेत्रांतील व्यक्तीही यावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.

हेही वाचा: शेवटच्या क्षणी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीला सांगितली ही गोष्ट; 'ड्रीम गर्ल' खुलासा करत म्हणाली, "त्यांनी मला..."