जेएनएन, मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या अमृताचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमृता चक्क विद्यार्थिनीच्या भूमिकेत दिसत असून, बाकावर बसून पेपर लिहिताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री नेमकी कोणती परीक्षा देत आहे, याचाही खुलासा तिने स्वतः सोशल मीडियावरील पोस्टमधून केला आहे.

अमृता खानविलकरने कथक नृत्यासाठी लेखी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती इतर विद्यार्थ्यांसोबत परीक्षा केंद्रात बाकावर बसलेली दिसते. तिच्या हातात हॉल तिकीट आणि रोल नंबर असून, ती प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे लिहिताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत अमृताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले की, 'स्वतःचा अभिमान वाटणारा आणखी एक दिवस... कथकसाठी माझी लेखी परीक्षा! हा प्रवास पूर्णपणे वैयक्तिक आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वतःला वचन दिले होते की, केवळ माझ्या आनंदासाठी मी या मार्गावर चालेन. कोणतीही घाई नाही, कोणतीही अट नाही; फक्त एकेक पाऊल पुढे टाकत राहायचे.'

पुढे तिने म्हटले की, आज इतर विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून, हातात हॉल तिकीट आणि रोल नंबर घेऊन, खिडकीजवळच्या जागेत बसून प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिताना खूप छान वाटले. या प्रवासात नेहमी आपला हात धरून सोबत राहिल्याबद्दल तिने प्रिय व्यक्तीचे आभारही मानले आहेत.

अमृताने केवळ अभिनयापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता कथक नृत्याची आवडही जपली आहे. तिच्या या पोस्टमधून नृत्याविषयीची तिची निष्ठा आणि शिकण्याची जिद्द दिसून येते. अभिनेत्रीच्या या नव्या अनुभवाचे चाहते कौतुक करत असून, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: ‘मामांनी प्रत्येक फ्रेममध्ये उमटवली छाप’; अशोक सराफ यांच्या ‘आदि अनंत’ चित्रपटाचे रितेश देशमुखकडून कौतुक