जेएनएन, मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘माझ्या सोन्या’ या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. या गाण्यातील अभिनेत्री ऐश्वर्या हरिशंकर यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, ‘माझ्या सोन्या’मधील या अभिनेत्रीची नेमकी ओळख काय? अभिनयासोबतच निर्मिती आणि डिजिटल कंटेंटच्या क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अमेरिकेतील डेट्रॉईट, मिशिगन येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्या हरिशंकर यांनी वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली. मानसशास्त्र विषयात बी.ए. पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कलात्मक प्रवासाला सुरुवात केली. अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया अशा विविध क्षेत्रांत काम करत त्यांनी अल्पावधीतच आशादायी युवा कलाकार म्हणून ओळख निर्माण केली आहे.
‘माझ्या सोन्या’सह या म्युझिक व्हिडिओंमध्येही काम
गेल्या काही वर्षांत ऐश्वर्या यांनी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील विविध प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. ‘लाल बिंदी’, ‘माझ्या सोन्या’ आणि ‘लिपस्टिक’ या मराठी म्युझिक व्हिडिओंमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः ‘माझ्या सोन्या’ हे गाणे सोशल मीडियावर चर्चेत आल्याने ऐश्वर्या यांचे नाव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेत आले आहे.
याशिवाय ‘आधार कार्ड’ या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनेत्री तसेच निर्माती म्हणून काम केले आहे. हिंदी मनोरंजन क्षेत्रातही त्यांनी ‘Band Aid’ आणि ‘Hide and Seek’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. आगामी काळात त्यांचे काही नवे मराठी रॅप म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता
अभिनयासोबतच ऐश्वर्या हरिशंकर सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर म्हणूनही लोकप्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, यूट्यूबवरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. फॅशन, लाइफस्टाइल आणि मनोरंजनाशी संबंधित त्यांच्या कंटेंटला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळतो.
डिजिटल क्षेत्रातील लोकप्रियतेमुळे त्यांनी Suta Bombay, Dabur Amla, Lakmé आणि Faces Canada यांसारख्या ब्रँड्ससोबतही काम केले आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करण्यासोबतच डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणूनही त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही वाटचाल
ऐश्वर्या यांच्या कारकिर्दीची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे चित्रपट निर्मिती. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रात काम करत त्यांनी मनोरंजनविश्वातील विविध पैलूंचा अनुभव घेतला आहे. सतत काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती, मेहनत, शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्या मानतात.
आगामी काळात ऐश्वर्या हरिशंकर यांचे काही नवे चित्रपट, म्युझिक व्हिडिओ आणि डिजिटल प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे ‘माझ्या सोन्या’नंतर त्यांच्या आगामी कामांकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सतर्क राहा, सावधान राहा, आता वेगळ्या आवाजात… अनुप सोनी नाही, तर हा बॉलिवूड सुपरस्टार होस्ट करेल 'क्राईम पेट्रोल'
