जेएनएन, मुंबई: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तब्बल 9 वर्षांनंतर महाराष्ट्रात महापालिका निवडणुका होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, नागरिक मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांकडे जात आहेत.

या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांसह अनेक कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. काही कलाकारांनी मतदानानंतरचे फोटो आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर करत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.

अभिनेता शशांक केतकरने देखील आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदानानंतर त्याने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या विशेष चर्चेत आली आहे. शशांकने मतदान केंद्राबाहेरील अस्वच्छतेकडे लक्ष वेधत प्रशासन आणि नागरिकांवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.

शशांक केतकरने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मतदान केंद्राबाहेरील परिस्थितीचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “या निवडणुकीत अनेक मुद्दे जनतेसमोर आहेत. सामान्य नागरिकाला भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्याची आश्वासने जवळपास सर्वच उमेदवार देत आहेत. मात्र ज्या शाळेत मी मतदान केले, त्या शाळेच्या अगदी बाहेर ही अवस्था आहे. उद्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी ‘स्वच्छता’सारख्या मूलभूत गोष्टींसाठी पुढाकार घेतला जाणार नाही आणि नागरिकही स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहणार नाहीत, याची खात्री आहे.”

तो पुढे म्हणतो, “ही माझ्या मनातली उदासीनता किंवा नकारात्मकता नाही, तर वस्तुस्थिती आहे. ही ठाण्यातील एक ‘इंटरनॅशनल स्कूल’ आहे आणि त्या शाळेच्या दारातच अशी अवस्था आहे.”

शशांक केतकरच्या या स्पष्ट आणि निर्भीड पोस्टवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्याच्या प्रामाणिक मतप्रदर्शनाचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे, “कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे सत्य मांडणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर.”

    तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “अरे वाह ठाणेकर… मतदानाचा हक्क बजावला आणि प्रशासन तसेच नागरिकांचेही कान टोचले. खरोखरच जागरूक नागरिक!”
    एका युजरने थेट उमेदवारांनाच सल्ला देत म्हटले आहे, “प्रचार करण्यापेक्षा उमेदवाराने स्वतः साफसफाई करून मत मागितली असती, तर किमान दोन मतं तरी जास्त मिळाली असती.”

    शशांक केतकरच्या या पोस्टमुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, नागरिकांची जबाबदारी आणि प्रशासनाची कार्यपद्धती यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

    हेही वाचा: BMC Election 2026 Voting LIVE: शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा - मुंबई आयुक्तांच्या सूचना