जेएनएन, मुंबई. Actor Dino Morea Case: बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी सुरु आहे. मिठी नदीतील गाळ उपसा कामातील कथित आर्थिक अनियमितता प्रकरणात ही चौकशी असून. या प्रकरणात याआधीही अभिनेत्याची चौकशी करण्यात आली.

मिठी नदीच्या गाळ उपसा आणि स्वच्छता कामांशी संबंधित कंत्राटांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा EOW तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेला सुमारे 65.54 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. कंत्राट प्रक्रिया, आर्थिक व्यवहार, गाळाची वाहतूक आणि विल्हेवाट यासंबंधीच्या कथित अनियमिततेचा तपास सुरू आहे.

डिनो मोरिया आणि सँटिनो रोको मोरिया यांची चौकशी
डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो रोको मोरिया यांची यापूर्वी मे 2025 मध्येही चौकशी करण्यात आली होती. तपासादरम्यान काही संबंधित व्यक्तींशी डिनो मोरियाचा संपर्क असल्याचे फोन रेकॉर्डमधून आढळल्याने त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे पोलिस सूत्रांच्या हवाल्याने वृत्त आहे.

तपासात डिनो मोरिया, त्याचा भाऊ सँटिनो मोरिया आणि या प्रकरणातील आरोपी केतन कदम यांच्या व्यावसायिक तसेच आर्थिक संबंधांबाबतही माहिती तपासली जात असल्याचे वृत्त आहे. या संदर्भातील व्यवहार आणि कागदपत्रांची पडताळणी तपास यंत्रणांकडून केली जात आहे. 

दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पुढे सुरू आहे. डिनो मोरियाच्या सुरु असलेल्या चौकशीनंतर या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.