जेएनएन, पुणे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहेत. यापूर्वीच विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाने परीक्षा शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ (Fee Hike) केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा वाढीव भार पडला आहे. विद्यापीठाने यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

परीक्षा फीसमध्ये वाढ

पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न अहिल्यानगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीसमध्ये वाढ होणार आहे. 

विद्यापीठाने थेट 20 टक्के वाढवली फीस 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत 2018 ते 20 मध्ये 15 टक्के शुल्क वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु, कोरोना काळात शुल्कवाढ करणे संयुक्तिक नसल्याने विद्यापीठाकडून शुल्क वाढ केली गेली नाही. सुमारे सात वर्षांपासून विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केली नव्हती. त्यामुळे आता विद्यापीठाने थेट 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी संघटनांचा निषेधाचा इशारा

    मागील काही वर्षांचा विचार करता विद्यापीठाकडून 55 टक्के शुल्क वाढ करणे क्रमप्राप्त होते. मात्र विद्यापीठाने 20 टक्के शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे विद्यार्थांमध्ये नाराजी आहे. तर काही विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचा निषेध करण्याचा इशारा दिला आहे.