जेएनएन, पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आयोजित केलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा अंतिम निकाल  रात्री जाहीर केला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा विजय लमकणे  यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर हिमालय घोरपडे दुसऱ्या आणि रवींद्र भाबड तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) आणि पात्रतागुण (Cut-off Marks) जाहीर केले आहेत. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा 27 ते 29 मे 2024 दरम्यान पार पडली होती. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.

एकूण 1516 उमेदवारांची मुलाखत 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत घेण्यात आली, आणि त्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला.

या निकालानंतर राज्यभरात उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विजय लमकणे यांनी मिळवलेला पहिला क्रमांक सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या यशाबद्दल विविध शैक्षणिक संस्था, मार्गदर्शक वर्ग आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एमपीएससीने जाहीर केलेल्या या निकालानुसार अनेक उमेदवार राज्य प्रशासन सेवा, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सहाय्यक आयुक्त, नायब तहसीलदार अशा विविध पदांसाठी पात्र ठरले आहेत.

हेही वाचा: Maharashtra Politics: ..तोपर्यंत निवडणुका नाही, सदोष मतदार याद्यांविरोधात विरोधकांची वज्रमूठ; उद्धव-राज ठाकरेंच्या उपस्थितीत काय-काय ठरलं?