मुंबई. Maharashtra Police Recruitment: महाराष्ट्राच्या पोलीस दलात सेवा बजावण्यासाठी इच्छूक व त्यासाठी रात्रंदिवस तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गृह मंत्रालयाकडून पोलीस भरतीबाबत वेगाने हालचाली सुरू झाल्या असून लवकरच राज्यात तब्बल 8,100 पोलीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.
या आगामी भरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. गृह मंत्रालयाने जून 2027 पर्यंत रिक्त होणाऱ्या सर्व पोलीस अंमलदारांची सविस्तर माहिती मागवली आहे. नवीन वर्षात म्हणजे 2027 मध्ये ही भरती प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होईल, अशी माहिती समोर येत आहे.
कशी असेल भरती प्रक्रिया -
मागील भरती प्रक्रियेमधील शारीरिक व लेखी परीक्षांचे निकाल आणि उमेदवारांच्या नियुक्तीची अंतिम कामे पूर्ण झाल्यानंतर, नवीन पोलीस भरतीची जाहिराती प्रसिद्ध होऊ शकते. पोलीस भरतीची नवीन जाहिरात केव्हा येणार या कडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. या सर्व उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गृह विभागातील संभाव्य नियोजन आणि पदभरती प्रक्रियेच्या टप्प्यांनुसार, महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन जाहिरात यावर्षीच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर ते डिसेंबर 2026 दरम्यान प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे.
प्राप्त माहिती नुसार, राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये आणि SRPF गटांमधील रिक्त पदांचा सुधारित अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. याचा अहवाल तयार करून मंजुरी मिळण्यास 3ते 4 महिन्यांचा अवधी लागतो. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना साधारणपणे 30 ते 40 दिवसांचा कालावधी दिला जातो. म्हणजेच भरती प्रक्रिया मार्च 2027 पर्यंत राबवली जाऊ शकते. मात्र भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे तरुणांनी जाहिरातीची वाट न पाहता आतापासूनच आपली नियोजनबद्ध तयारी सुरू ठेवणे फायदेशीर ठरेल
भरतीचे संभाव्य नियोजन
- एकूण रिक्त पदे 8,100
- जाहिरात प्रसिद्ध -नोव्हेंबर-डिसेंबर 2026
- भरतीसाठी अर्जाची मुदत – 1 ते 31 डिसेंबर 2026
- भरतीला सुरवात – 1 जानेवारी ते 31 मार्च 2027
याआधी भरती झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण जूनपासून सुरू झाले असून उर्वरित उमेदवारांचे प्रशिक्षण फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारी 2027 पासूनच नवीन भरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात केली जाऊ शकते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पोलीस भरतीची प्रक्रिया जानेवारी 2027 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्ये अर्ज, मार्चपर्यंत भरती प्रक्रिया-
आगामी 8100 पदांच्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांना 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत अर्ज करता येणार असल्याची माहिती आहे. यानंतर 1 जानेवारी ते 31 मार्च 2027 या कालावधीत भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पोलीस भरतीची प्रक्रियेचे टप्पे -
- मैदानी/शारीरिक चाचणी : यामध्ये 50 गुणांसाठी शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये धावणे, गोळाफेक, लांब उडी यांसारख्या मैदानी प्रकारांचा समावेश असतो.
- लेखी परीक्षा (Written Exam): मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 100 गुणांची बहुपर्यायी (MCQ) लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आदीवर प्रश्न विचारले जातात.
- वैद्यकीय तपासणी व कागदपत्र पडताळणी: शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेत पास होऊन अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे आणि आरोग्य तपासणी करून अंतिम निवड केली जाते.
हे ही वाचा -KVIC Recruitment 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! खादी ग्रामोद्योगात मोठी भरती, 30 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
