जेएनएन, मुंबई. Maharashtra Education News: महाराष्ट्रातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी  8 आणि 9 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान, समाज माध्यमावर उद्या आणि 9 जुलै रोजी शाळा बंद राहणार आहेत, असा एक संदेश पसरवण्यात येत आहे. यावर आता शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  8 आणि 9 जुलै 2025 रोजी आंदोलन

महाराष्ट्रातील शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहतील असा दावा समाज माध्यमांवर करण्यात आला आहे. हा दावा चुकीचा आहे. राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8 आणि 9 जुलै 2025 रोजी आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. मात्र, या दोन्ही दिवशी राज्यभरातील शाळा सुरू राहणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने (Maharashtra Education Department) स्पष्ट केले आहे. 

राज्यातील कोणत्याही शाळा बंद राहणार नाही

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी हे आदेश काढले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता, 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील कोणत्याही शाळा बंद राहणार नाहीत, असे या आदेशात म्हटले आहे.

पालक द्विधा मनस्थितीत

    मात्र, आता शिक्षण विभागाने थेट आदेश काढल्याने परिस्थिती बदलली आहे. एकीकडे शिक्षक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या दुहेरी भूमिकेमुळे पालकांसमोर नेमके काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पालक हे द्विधा मनस्थितीत पडले आहेत.