स्पोर्ट्स डेस्क, नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने आधीच पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हायब्रिड मॉडेलनुसार दुबईमध्ये आपले सामने खेळत आहे.
आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये फक्त अंतिम सामना उरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी टीम इंडियाने दुबईतच सर्व सामने खेळल्याने यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पाकिस्तानी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की भारतीय संघाला दुबईमध्ये सर्व सामने खेळण्याचा फायदा मिळत आहे. याच मुद्द्यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना विचारण्यात आले आणि त्यांनी यावर सडेतोड उत्तर दिले.
राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानी पत्रकारांना दिले परखड उत्तर
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी 5 मार्च रोजी पाकिस्तानच्या 3-दिवसीय दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी मीडियाच्या प्रश्नांना उत्तर दिले. त्यांना विचारण्यात आले की, भारतीय संघ आपल्या सर्व सामन्यासाठी दुबईमध्येच का खेळतो आहे? अन्य संघांना सतत प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे हा भेदभाव नाही का?
यावर उत्तर देताना शुक्ला म्हणाले, "ही फेअर-अनफेअरची गोष्ट नाही. जेव्हा आयसीसीने हा निर्णय घेतला, तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की भारतीय संघाचे सामने दुबईमध्येच होणार. टीम इंडिया कोणत्याही एकाच विकेट किंवा पिचवर अवलंबून नाही. आमचा संघ आपल्या खेळाडूंच्या जोरावरच खेळतो आणि जिंकतो."
"चॅम्पियन्स ट्रॉफी अत्यंत यशस्वी ठरली" - शुक्ला
शुक्ला पुढे म्हणाले की, "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी अत्यंत चांगल्या प्रकारे आयोजित केली जात आहे. पाकिस्तान आणि दुबईमध्ये सामने उत्तम प्रकारे पार पडले. यावरून हे स्पष्ट होते की हा यशस्वी टूर्नामेंट ठरला आहे."
जेव्हा पत्रकाराने विचारले की, "जर अंतिम सामना लाहोरमध्ये झाला असता, तर 1996 च्या आठवणी ताज्या झाल्या असत्या," यावर उत्तर देताना शुक्ला म्हणाले, "जर तसे हवे होते, तर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकायला हवा होता, पण ते हरले. आता ते हरले, त्यामुळे अंतिम सामना दुबईमध्येच होणार."
भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर राजीव शुक्ला काय म्हणाले?
यासोबतच, भारत आणि पाकिस्तानमध्ये तटस्थ स्थळी द्विपक्षीय मालिका होऊ शकते का? या प्रश्नावर उत्तर देताना शुक्ला म्हणाले, "भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय हा भारत सरकारच्या परवानगीवर अवलंबून आहे.
बीसीसीआय उपाध्यक्ष पुढे म्हणाले, "हे खरे आहे की भारत आणि पाकिस्तानमधील चाहत्यांना दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळावेत असे वाटते, पण बीसीसीआयची स्पष्ट भूमिका आहे की द्विपक्षीय सामने एकमेकांच्या भूमीवरच खेळले पाहिजेत, तटस्थ स्थळी नव्हे. आणि पीसीबीचीही कदाचित हाच दृष्टिकोन असेल."