जेएनएन, मुंबई. Shardiya Navratri 2025: नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ मानले जाते. येथे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर आहे. रेणुका माता या भगवान परशुरामाच्या आई म्हणून ओळखल्या जातात. याशिवाय माहूरगड हे दत्तात्रेय भगवानांचे जन्मस्थान असून, अत्री ऋषी आणि माता अनुसया यांचा वासस्थान म्हणूनही माहूरची ओळख आहे.
माहूरमध्ये रेणुका देवी मंदिरासह भगवान दत्तात्रेय मंदिर, माता अनुसया मंदिर, भगवान परशुराम मंदिर, देवदेवेश्वर मंदिर, कालिका माता मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत. याशिवाय येथील प्राचीन किल्ला, पांडव लेणी, सोनापीर दर्गा, शेख फरीद धबधबा, माहूर संग्रहालय आणि राजे उदाराम देशमुख यांचा ऐतिहासिक वाडा पर्यटकांना आकर्षित करतो.
माहूर परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला असून येथे मोर, हरीण, काळे अस्वल आणि पँथर यांसारखे वन्यजीव आढळतात. सागवानाच्या दाट झाडांनी व्यापलेला हा परिसर निसर्गप्रेमींसाठीही पर्वणी ठरतो.
रेणुका मातेची आख्यायिका
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने राजा रेणुच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला आणि त्यांचे नाव रेणुका पडले. त्यांचा विवाह जमदग्नी ऋषींशी झाला. सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला करून जमदग्नी ऋषींचा वध केला. त्यानंतर परशुरामाने माहूर येथे पित्याचे अंत्यसंस्कार केले. त्यावेळी आई रेणुका सती गेली आणि आकाशवाणीने तिला पुनःदर्शन देण्याचे आश्वासन दिले. परंतु परशुरामाने मागे वळून पाहिल्यामुळे केवळ तिचे शिरच भूमीतून प्रकट झाले, ज्याला "तांदळा" असे म्हणतात.
प्रवास सोयी
माहूरला जाण्यासाठी नागपूर, नांदेड, किनवट, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि पुसद येथून एसटी बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळचे विमानतळ नांदेड आहे, जे प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. रेल्वेमार्गेही नांदेडपर्यंत पोहोचून पुढे बस किंवा टॅक्सीने माहूरला जाता येते.
हेही वाचा: Shardiya Navratri 2025: नवरात्रीत पारिजात फुलाचा वापर करून करा हे उपाय, अनेक समस्या होतील दूर
विजयादशमीच्या दिवशी येथे भव्य जत्रा भरते आणि हजारो भक्त रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहूरला भेट देतात. त्यामुळे शारदीय नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात माहूर धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्वाचे ठरते.