जेएनएन, नागपूर. shardiya navratri 2025: तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे शारदीय नवरात्र महोत्सव शके 1947 ची सुरुवात मोठ्या भक्तिभावाने होत आहे. 14 सप्टेंबरपासून सुरू झालेला हा महोत्सव 8 ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि छबिना मिरवणुकांसह साजरा केला जाणार आहे.

22  सप्टेंबर रोजी पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना आणि दुपारी घटस्थापना होणार आहे. त्यानंतर दररोज नित्योपचार पूजा, विशेष अलंकार महापूजा आणि रात्री छबिना मिरवणुका काढल्या जातील. ललिता पंचमी (26 सप्टेंबर), दुर्गाष्टमी (30 सप्टेंबर), महानवमी (1 ऑक्टोबर) आणि विजयादशमी (2 ऑक्टोबर) या दिवशी विशेष धार्मिक सोहळे होणार असून वैदिक होम, हवन, शस्त्रपूजन आणि शमीपूजन यांचा समावेश असेल.

6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून पूजाविधी होणार असून 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमा व अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात देशभरातून लाखो भाविक तुळजापूरला दर्शनासाठी येणार असल्याने मंदिर संस्थान आणि प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

कार्यक्रमांचे वेळापत्रक :

  • 14 सप्टेंबर (भाद्रपद वद्य 8, रविवार) : संध्याकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रा घालून महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
  • 22 सप्टेंबर (अश्विन शु. 1, सोमवार) : पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल. दुपारी १२ वाजता घटस्थापना केली जाईल. याच दिवशी ब्राह्मणास अनुष्ठानाची वर्णी दिली जाईल आणि रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येईल.
  • 23 ते 25 सप्टेंबर (अश्विन शु. 2 ते 3) : दररोज देवीची नित्योपचार पूजा होईल आणि रात्री छबिना मिरवणूक काढली जाईल.
  • 26 सप्टेंबर (अश्विन शु. 4, शुक्रवार – ललिता पंचमी) : या दिवशी देवीची नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा आणि रात्री छबिना आयोजित आहे.
  • 27 सप्टेंबर (शनिवार) : मुरली अलंकार महापूजा.
  • 28 सप्टेंबर (रविवार) : शेषशायी अलंकार महापूजा.
  • 29 सप्टेंबर (सोमवार) : भवानी तलवार अलंकार महापूजा.
  • 30 सप्टेंबर (मंगळवार – दुर्गाष्टमी) : देवीची नित्योपचार पूजा, महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, दुपारी 1 वाजता वैदिक होम व हवनास सुरुवात होऊन सायंकाळी 6.10 वाजता पूर्णाहुती होईल. रात्री छबिना मिरवणूक होईल.
  • 1 ऑक्टोबर (बुधवार – महानवमी) : देवीची महापूजा, दुपारी होमावरील धार्मिक विधी, घटोस्थापना, तसेच नगरातून येणारे पलंग व बुऱ्हाणनगर येथील संत जानकोजी भगत यांच्या पालखीची मिरवणूक निघेल.
  • 2 ऑक्टोबर (गुरुवार – विजयादशमी/दसरा) : पहाटे सार्वत्रिक सिमोल्लंघन, देवीचे शिबीकारोहण, मंदिर परिसरात मिरवणूक, मंचकी निद्रा आणि शमीपूजनाचे आयोजन केले जाईल.
  • 6 ऑक्टोबर (सोमवार – कोजागिरी पौर्णिमा) : विशेष धार्मिक पूजाविधी होतील.
  • 7 ऑक्टोबर (मंगळवार – मंदिर पौर्णिमा) : पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना व नित्योपचार पूजा. रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना आणि जोगवा काढण्यात येईल.
  • 8 ऑक्टोबर (बुधवार) : देवीची नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद वितरण, तसेच रात्री पुन्हा सोलापूरच्या काठ्यांसह छबिना काढला जाईल.

    हेही वाचा: Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला अर्पण करा हे नऊ वेगवेगळे नैवेद्य, तुम्हाला मिळेल जीवनातील सर्व आनंद

    हेही वाचा: Shardiya Navratri 2025: श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा