जेएनएन, मुंबई. shardiya navratri 2025 : नवरात्रोत्सवासाठी भक्तांची उत्सुकता वाढत असून या वर्षी शारदीय नवरात्र सोमवार, 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणार आहे. देवी दुर्गेच्या विविध स्वरूपांची उपासना करण्याचा हा काळ आहे. या नऊ दिवसांत भक्त उपवास, जागरण, गरबा-दांडिया तसेच विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात. उपवास हा या उत्सवाचा महत्त्वाचा भाग असून त्यासंबंधीचे नियम, काय खावे आणि काय टाळावे याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 06.09 ते 08.06 या काळात आहे, जे भक्तांनी नवरात्र आराधनेची अधिकृत सुरुवात म्हणून मानले आहे. काही स्त्रोतांनुसार, नवरात्राचा कालावधी 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहील. विजयादशमी (दसरा) 2 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल.

उपवासाचे नियम

  • उपवास करताना स्वच्छता, संयम आणि सात्त्विकता पाळणे महत्त्वाचे मानले जाते.
  • सकाळ-संध्याकाळ देवीची आराधना, मंत्रजप व आरती करणे आवश्यक आहे.
  • कांदा, लसूण, मांसाहार, मद्य यांचा उपवासाच्या काळात पूर्णत्यः त्याग केला जातो.
  • काही लोक नवरात्रभर फक्त फळाहार घेतात, तर काही जण एकवेळ उपवास किंवा दूध-फळांवरच राहतात.

उपवासात काय खावे?

  • फळाहार: केळी, सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी यांसारखी ताजी फळं.
  • साबुदाणा पदार्थ: साबुदाण्याची खिचडी, वडा, थालीपीठ.
  • भगर व राजगिरा: भगराची खिचडी, भगर भात, राजगिरा पुरी, राजगिरा लाडू.
  • शेंगदाणे व सुकेमेवे: भाजलेले शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड.
  • दूध व दुधापासूनचे पदार्थ: दूध, ताक, श्रीखंड, खीर (लालसाखर/गुळ वापरून).
  • सेंदळे मीठ (सेंधव मीठ): उपवासातील पदार्थांत फक्त सेंधव मीठ वापरण्याची प्रथा आहे.

उपवासात काय टाळावे?

  • धान्य व गहू-तांदूळ पदार्थ: भाकरी, पोळी, भात टाळावा.
  • डाळी व कडधान्ये: मसूर, मूग, हरभरा व इतर डाळी उपवासात खाल्ले जात नाहीत.
  • मसाले व हिंग: गरम मसाले, हिंग, मोहरी व हळद टाळली जाते.
  • कांदा-लसूण: उपवासात अपवित्र मानले जातात.
  • जंक फूड व पॅकेज्ड पदार्थ: चिप्स, पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ उपवासाच्या सात्त्विकतेला धरून नाहीत.

आध्यात्मिक महत्त्व

नवरात्रातील उपवास केवळ शारीरिक शुद्धीसाठी नसून मानसिक आणि आत्मिक शुद्धीचा हेतूही साधतो. उपवासामुळे शरीर हलके राहते, मन शांत होते आणि साधनेत एकाग्रता वाढते, असा धार्मिक समज आहे.

हेही वाचा: Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रात या राशींवर असेल देवी दुर्गाचा आशीर्वाद, दूर होईल पैशाची कमतरता