एएनआय, नवी दिल्ली: अमेरिकेत अवैध मार्गाने प्रवेश केलेल्या 104 भारतीयांवरून आज संसदेत चांगलाच गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी नेत्यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. अमेरिकन सैन्याचे विमान बुधवारी या भारतीयांना घेऊन अमृतसरला पोहोचले. अमेरिकेतून पाठवलेल्या लोकांच्या हाता-पायांना बेड्या ठोकल्या होत्या, असा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव, काँग्रेस खासदार गुरजीत सिंह आणि इतर विरोधी नेत्यांनी संसदेत हातात बेड्या घालून निदर्शने केली.

प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली नाराजी

या घटनेवर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "बरेच काही बोलले गेले की राष्ट्रपती ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी खूप चांगले मित्र आहेत. मग पंतप्रधान मोदींनी हे का होऊ दिले? त्यांना परत आणण्यासाठी आपण आपले विमान पाठवू शकत नव्हतो का? माणसांशी अशी वागणूक केली जाते का? की त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून परत पाठवले जाते? परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यायला हवे."

हा भारताचा अपमान आहे: शशी थरूर

या घटनेवर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "ज्या पद्धतीने हे केले गेले, त्याला आमचा विरोध आहे. त्यांना त्या लोकांना निर्वासित करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे, पण त्यांना अशा प्रकारे अचानक लष्करी विमानातून हातकड्या लावून पाठवणे हा भारताचा अपमान आहे, हा भारतीयांच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे."