नवी दिल्ली, जेएनएन: Operation Sindoor Army Press Conference: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने घेतला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील (पीओके) तब्बल नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईची माहिती आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी या ऑपरेशनची माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना विदेश सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले, "पहलगाममधील हल्ला अत्यंत क्रूर होता. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर अगदी जवळून डोक्यात गोळ्या मारल्या. कुटुंबियांना मानसिक त्रास देण्याचा आणि दहशत निर्माण करण्याचा हा घृणास्पद प्रयत्न होता. काश्मीरमध्ये परत येत असलेली शांतता आणि पर्यटनाला असलेला प्रतिसाद उद्ध्वस्त करणे हा या हल्ल्यामागचा स्पष्ट उद्देश होता."

मिस्त्री यांनी पुढे सांगितले की, 'द रेझिस्टन्स फ्रंट' या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याचे थेट संबंध पाकिस्तानशी असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरच्या हवाई कारवाईची माहिती दिली, तर कर्नल सोफिया कुरेशी यांनी या ऑपरेशनच्या नियोजन आणि अंमलबजावणीबद्दल सांगितले. सैन्याच्या या अचूक आणि धडक कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, सीमाभागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.