पीटीआय, नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमधील लष्कर, जैश, हिजबुलच्या 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले आहे. मसूद अझहरचा (Masood Azhar) अड्डाही उद्ध्वस्त करण्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरने पीटीआयच्या हवाल्याने स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मसूद अझहरने सांगितले की, बहावलपूरमध्ये भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेले. 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद प्रमुखाची मोठी बहीण, तिचा पती, एक भाचा आणि एक भाची यांचाही समावेश आहे.

सहयोगी, त्याची आई आणि इतर दोघेही मृत्युमुखी

या हल्ल्यात अझहरचा एक जवळचा सहकारी, त्या सहकाऱ्याची आई आणि याव्यतिरिक्त अझहरचे आणखी दोन जवळचे साथीदारही मारले गेल्याचे पुढे सांगितले जात आहे.

मसूद अझहर किती हल्ल्यांमध्ये होता सामील

मसूद अझहर हा भारतासाठी एक मोठा दहशतवादी मानला जातो. मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा म्होरक्या आहे.

    या संघटनेने भारतात अनेक मोठे हल्ले घडवले आहेत, ज्यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. आता भारताने याचा बदला घेतला असून त्याचा जवळपास संपूर्ण अड्डाच संपवून टाकला आहे. तथापि, मसूद अझहर मारला गेल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

    हल्ल्यानंतर 15 दिवसांनी झाले ऑपरेशन सिंदूर

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 15 दिवसांनी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) एअर स्ट्राईक केली. लष्कराच्या या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले.