जेएनएन, पुणे: पुणे महानगरपालिकेची निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेने प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण पुणे शहरात यावेळी एकूण 35 लाख 51 हजार 469 इतके मतदार नोंदले गेले आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता ही मतदार यादी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
प्रारूप यादीतील आकडेवारीनुसार, प्रभाग क्र. 9 मध्ये सर्वाधिक – तब्बल 1 लाख 60 हजार 242 मतदारांची नोंद झाली आहे. शहरातील जलद वाढणारे उपनगर, वाढती वसाहत आणि लोकसंख्या वाढ यामुळे या प्रभागातील मतदारसंख्या मागील निवडणुकीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
त्याउलट, प्रभाग क्र. 39 हा सर्वांत कमी मतदारसंख्या असलेला प्रभाग ठरला आहे. येथे फक्त 62 हजार 205 मतदारांची नोंद झाली आहे. केंद्रबिंदू भागांमध्ये कमी लोकसंख्या आणि स्थिर वसाहतींमुळे येथे मतदारसंख्या तुलनेने कमी असल्याचे निरीक्षण आहे.
याशिवाय, पुणे शहरात एकूण तीन लाख 468 इतके दुप्पट मतदार (Duplicate Voters) आढळले असून त्यांची तपासणी केली जात आहे. मतदारांनी नाव दुप्पट असल्यास किंवा चुकीच्या प्रभागात नोंद झाल्यास, ठराविक कालावधीत फॉर्म भरून दुरुस्ती करणे आवश्यक ठरणार आहे. या दुरुस्ती मोहिमेची माहिती लवकरच निवडणूक विभागाकडून जाहीर केली जाईल.
निवडणूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रारूप यादीतील आपले नाव, पत्ता, मतदार क्रमांक आणि प्रभागाची माहिती नीट तपासावी. कोणतीही चूक आढळल्यास तातडीने सुधारणा अर्ज भरावा, जेणेकरून अंतिम मतदार यादीत अचूक नोंद होईल आणि मतदानाचा अधिकार कुठलाही अडचणी शिवाय बजावता येईल.
पुण्यातील महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने प्रारूप मतदार यादी जाहीर होणे हा महत्त्वाचा टप्पा समजला जात आहे. नागरिकांकडूनही यादीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पुढील काही दिवसांत याबाबत मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
