जेएनएन, पुणे: Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला आता निश्चित दिशा मिळणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाने लेखी परीक्षांसोबतच प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षांचाही कालावधी जाहीर केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
बारावीची लेखी परीक्षा ६ फेब्रुवारीपासून
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 6 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027 या कालावधीत पार पडणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना जानेवारी महिन्यापासूनच प्रात्यक्षिक परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे.
दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 15 मार्चदरम्यान
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. तर दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत पार पडणार आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन वेळेत करता यावे, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता यावे, या उद्देशाने मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
विषयनिहाय वेळापत्रक 6 डिसेंबरपासून उपलब्ध
दरम्यान, कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा पेपर असणार, यासंदर्भातील विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक 6 डिसेंबरपासून राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी विषयानुसार परीक्षेच्या तारखा तपासून अभ्यासाचे नियोजन करावे.
मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. संकेतस्थळावर उपलब्ध असलेले वेळापत्रक माहितीच्या उद्देशाने असून, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम राहणार आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर किंवा अन्य अनधिकृत संकेतस्थळांवर प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास न ठेवता मंडळाच्या अधिकृत सूचनांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा:CBSE Exam Schedule 2027: दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 16 फेब्रुवारीपासून परीक्षा, येथे करा डाउनलोड
