जेएनएन, नागपूर: मालेगाव येथे झालेल्या धक्कादायक घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी थेट कोर्टात घुसखोरी केली. या प्रकरणावर विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत नागरिकांचा उद्रेक हा प्रणालीवरील अविश्वासाचे द्योतक असल्याचे सांगितले.
“आज लोकांचा उद्रेक गुन्हेगाराविरोधात आहे, पण उद्या हाच उद्रेक सरकारविरोधातही होऊ शकतो. महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी असलेला दरारा आता दिसत नाही. गुन्हेगारांवर धाक उरलेला नाही आणि न्याय मिळणार नाही अशी भावना निर्माण झाल्यानेच लोक कोर्टात घुसले.” अशी टीका वड्डेटीवार यांनी केली.
पोलिस विभागासह संपूर्ण प्रशासन सुधारण्याची आज गरज आहे. “आमच्या सरकारच्या काळात अशा गंभीर गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून शक्ती कायदा आणला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. तसेच पोस्को कायद्याचा योग्य वापर न झाल्याने अशा घटना वाढताना दिसत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
मालेगाव प्रकरणातील आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी वड्डेटीवार यांनी केली.“या प्रकरणाची फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन एका महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. अशा शिक्षेमुळेच समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल अशी मागणी केली .
मालेगावमधील घटना, त्यानंतर उसळलेला नागरिकांचा संताप आणि त्यातून न्याययंत्रणेवर पडलेले प्रश्न यामुळे राज्यातील सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हेही वाचा: Malegaon मध्ये चार वर्षांच्या मुलीची बलात्कार करून करण्यात आली हत्या, न्यायालयाच्या आवारात उडाला गोंधळ, संपूर्ण शहर करण्यात आले बंद
