जेएनएन, नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील तीन विद्यार्थ्यांची इंडियन ब्युरो ऑफ माईन्स मध्ये निवड झाली आहे. संघराज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण करून विद्यार्थ्यांनी विभागाचा नावलौकिक वाढविला आहे. 

तेजस भोसले, शुभम मसुरकर व गोपाल डवरे अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भारत सरकारच्या इंडियन ब्युरो ऑफ माईन्स या कंपनीत संशोधन अधिकारी म्हणून तेजस व शुभम या दोघांची तर ओअर ड्रेसिंग ऑफिसर म्हणून गोपाल डवरे यांची निवड झाली आहे. संघराज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला त्यामध्ये दोघांची तर यापूर्वीच्या परीक्षेत डवरे यांची निवड झाली. 

भूगर्भशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण करीत विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत माहेश्वरी, विभाग प्रमुख डॉ. किर्तीकुमार रणदिवे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिघांचे कौतुक केले आहे. 

परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मनीष झोडपे यांच्याकडे 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार उपकुलसचिव मनीष प्रल्हाद झोडपे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मनीष झोडपे हे वित्त विभागात उपकुलसचिव असून त्यांच्याकडे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणार आहे. प्रभारी संचालक डॉ. संजय कवीश्वर यांच्याकडून मनीष झोडपे शनिवार, दि. 3 मे 2025 रोजी हा प्रभार स्वीकारला. यावेळी उपकुलसचिव डॉ. मोतीराम तडस, अधीक्षक राजेंद्र पाठक यांच्यासह अन्य उपस्थित होते.