जेएनएन, नागपूर: आज राज्यभरात 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जात आहे. मात्र, या निवडणुकांदरम्यान विविध ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे आरोप समोर येत असून त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी शाई नकली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही ठिकाणी शाई काही वेळातच पुसली जात असल्याचे मतदारांचे म्हणणे असून यामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यासोबतच काही भागांमध्ये बोगस मतदान झाल्याचे प्रकारही उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.
नागपुरातही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक मतदारांनी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई लगेच निघून जात असल्याची तक्रार केली आहे. तर काही मतदारांना मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांच्या नावावर आधीच कुणीतरी मतदान केल्याचे आढळून आले. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे.
याचबरोबर आज सकाळपासून नागपुरातील काही प्रभागांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रियेला उशीर झाला. ईव्हीएम सुरू न होणे, मशीन अडकणे किंवा वारंवार बंद पडणे अशा तक्रारींमुळे मतदारांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. परिणामी काही मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या सर्व तक्रारींची दखल घेत निवडणूक प्रशासनाने चौकशी सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी पर्यायी ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात आल्या असून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही तक्रार असल्यास थेट प्रशासनाकडे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकीकडे नागरिकांचा मतदानासाठी उत्साह दिसून येत असतानाच, अशा प्रकारच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही तासांत प्रशासनाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण आणि कारवाईची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Mumbai Election: ‘ही लोकशाहीची उघडपणे केलेली हत्या’ उद्धव ठाकरे संतापले
