जेएनएन, नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या ग्रंथालय विभागातर्फे शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि जपानी या चार परदेशी भाषांचे प्रशिक्षण अत्यंत माफक शुल्कात उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमाच्या एकूण शुल्कापैकी तब्बल ९० टक्के रक्कम मनपा भरणार असून, विद्यार्थ्यांना केवळ १० टक्के शुल्क भरावे लागणार आहे. या उपक्रमासाठी २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
जागतिकीकरणाच्या काळात परदेशी भाषांचे ज्ञान हे उच्च शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या, बहुराष्ट्रीय उद्योग, पर्यटन, अनुवाद, शिक्षण आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांत परदेशी भाषा अवगत असलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध होऊ शकतात. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय भाषा प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
महापौर निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे परदेशी भाषांचे प्रशिक्षण घेण्यापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
चार भाषांसाठी 200 विद्यार्थ्यांना प्रवेश
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि जपानी या चार भाषांचे सहा महिन्यांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक भाषेसाठी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, एकूण २०० विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार चारपैकी कोणत्याही एका भाषेची निवड करता येणार आहे. मात्र, एका विद्यार्थ्याला केवळ एकाच भाषेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.
अभ्यासक्रम शुल्काचा 90 टक्के भार मनपा उचलणार
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मनपा अभ्यासक्रम शुल्काच्या ९० टक्के रकमेचा भार उचलणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ १० टक्के शुल्क भरून सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेता येणार आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना संबंधित भाषांचे ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

अटल बिहारी वाजपेयी ई-ग्रंथालयात प्रशिक्षण
सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण अभ्यासक्रम लोधीपुरा येथील गीतांजली टॉकीज चौकाजवळ असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-ग्रंथालयात आयोजित करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशी भाषांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ऑनलाइन नोंदणी विनामूल्य; 30 नोव्हेंबर अंतिम तारीख
या प्रशिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे. अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती, प्रवेश प्रक्रिया आणि आवश्यक अटी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित क्यूआर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे परदेशी भाषा शिकण्याची इच्छा असलेल्या नागपूरमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि निर्धारित मुदतीत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
