जेएनएन, नागपूर: धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला नागपुरात येणाऱ्या लाखो अनुयायांना नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध पातळ्यांवर पुरविल्या जात असलेल्या नागरी सुविधांच्या व्यवस्थेला आता अंतिम रुप येत आहे. दीक्षाभूमी परिसराचे समतलीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांतीची व्यवस्था, अनुयायांना राहण्याची व्यवस्थेसह नागरी सुविधा पुरविण्यासोबतच त्यांच्यासाठी महानगरपालिकेतर्फे माहिती नियंत्रण कक्षाची व्यवस्था केली जात आहे. दीक्षाभूमी, माता कचेरी, शासकीय आयटीआय, समाज कल्याण भवन व कारागृहात परिसरात नागपूर महानगरपालिकेने या परिसरात नागरी सुविधा पुरविल्या आहेत. या सुविधा येत्या ३० सप्टेंबरपासून अनुयायांसाठी उपलब्ध होणार आहेत.
नागपूर शहरात 2 ऑक्टोंबर रोजी दीक्षाभूमी येथे ६९ वा धम्मच्रक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ३० सप्टेंबरपासूनच अनुयायांचे नागपुरात आगमन सुरू होणार आहे. त्यामुळे नागपूरातील दीक्षाभूमीवर अनुयायींची मोठी गर्दी होणार आहे. ही शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सहकार्याने अनुयायांना नागरी सुविधा पुरविण्याच्या योजनेला अंतिम रुप दिले.
स्वच्छतेला प्राधान्य
मनपातर्फे आयटीआय परिसर, माता कचेरी, कुर्वेज हायस्कूल परिसर, संकल्प कार्यालय परिसर, मनपा नियंत्रण कक्षाच्या मागे, पोलिस नियंत्रण कक्ष दीक्षाभूमी परिसर, कारागृह परिसर, अंबाझरी तलाव, डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज मागे इत्यादी ठिकाणी स्थायी आणि अस्थायी असे 1000 च्या जवळपास शौचालयाची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय 7 फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर 4 सक्शन कम जेटींगमशीनद्वारे शौचालयाची स्वच्छता करण्यात येणार आहे.
तसेच मनपाद्वारे माताकचेरीमधील विद्यार्थी वसतीगृहाजवळ आणि आयटीआय परिसरात स्नान करण्याची व्यवस्था केली जात आहे. दीक्षाभूमी लगतचा परिसरातील सर्व रस्ते स्व्चछ राखण्याकरिता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छतेसाठी तीन पाळ्यांमध्ये ६५० सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नागपुरात येणाऱ्या या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही. याकरिता या परिसरात वाढलेली झाडे, झुडपे ग्रास कटरच्या सहाय्याने कापून काढण्यात आली. तसेच या परिसराची खास मोहिमेअंतर्गत सखोल स्वच्छता करण्यात आली. दीक्षाभूमीवर व इतर काही भागात जमीन समतल करण्यात आली. परिसरातील झाडाच्या फांद्या कापण्यात आल्या. तसेच फुटपाथ सुद्धा स्वच्छ करण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्याद्वारे दीक्षाभूमी परिसरातील ड्रेनजची स्वच्छता करून गाळ काढला जात आहे. याशिवाय दीक्षाभूमी परिसरा लगत कचरा टाकण्याकरिता 200 कचऱ्याच्या पेट्यांची अतिरिक्त व्यवस्था केली जात आहे.
नियंत्रण कक्ष
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायी लोकांसाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहे. येथून अनुयायांना मदत पुरविली जाईल तसेच व्यवस्थेच्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे.
वैद्यकीय सुविधा 24 तास
दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता दवाखान्याची आणि 24 तास रुग्णवाहिका व्यवस्था केली जाणार आहे. मनपाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 120 नळाद्वारे केली जात आहे. त्याचबरोबर पोलिस आणि मनपा नियंत्रण कक्ष, अग्निशमन पथक, 460 पथ दिव्यांची अतिरिक्त व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने 40 सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन पथक आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दीक्षाभूमी परिसरात मुक्कामी येणाऱ्या अनुयायांसाठी विश्रांतीकरीता आयटीआय परिसररात भव्य मंडप उभारण्यात सेवयेत आहे. शिवाय पावसामुळे दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून निवारा व्यवस्थेवर शेड टाकण्यात आले आहे. शिवाय विश्रांती ठिकाणी जमीनीवर प्लायवूडची व्यवस्था करण्यात येत आहे.
आपली बसची विशेष सेव
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना ड्रॅगन पॅलेससह शहरातील इतर भागात जाण्यासाठी महानगरपालिकेच्या आपली बस सेवा दीक्षाभूमी परिसरातून उपलब्ध राहणार आहे. यासाठी महापालिकेने अतिरिक्त फेऱ्या या काळात सुरू राहणार आहे.