जेएनएन, नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार अपर विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी गुरुवार, दि. 13 मार्च 2025 रोजी स्वीकारला. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्याकडून डॉ. माधवी खोडे चवरे यांनी कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारला.
कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर डॉ. माधवी खोडे चवरे यांनी वेळेवर परीक्षा घेत तातडीने निकाल घोषित केले जाणार असल्याची माहिती दिली. उन्हाळी 2025 दरम्यान एक हजार पेक्षा अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विद्यापीठाचे प्रशासकीय कार्य विद्यार्थी केंद्रित असावे, अशा देखील त्या म्हणाल्या.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अजय चव्हाण, आयआयएल संचालक डॉ. निशिकांत राऊत यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.