जेएनएन, नागपूर: नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला ‘मारबत महोत्सव’ यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. तब्बल १४५ वर्षांची परंपरा असलेल्या या महोत्सवाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष नियोजन केले आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून, शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे महापौर निता ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पिवळी मारबत तऱ्हाने तेली समाजाच्या वतीने, तर काळी मारबत काली मारबत उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणार आहे. येत्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्य मारबत महोत्सव होणार असून, त्याच्या यशस्वी आयोजनासाठी मनपाच्या विविध विभागप्रमुखांवर विशेष जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

गांधीपुतळा चौकात मुख्य कार्यक्रम
मारबत महोत्सवाच्या मार्गावर नागरिकांचे स्वागत करण्यासाठी मनपातर्फे विविध ठिकाणी स्वागत मंच उभारण्यात येणार आहेत. कुंभारपुरा चौक, गोळीबार चौक, भारत माता चौक, शहीद चौक, टांगा स्टँड चौक, गांधीपुतळा चौक, कोतवाली चौक आणि मस्कासाथ येथील छोटेलाल हलवाईसमोरील परिसरात स्वागताची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मनपाचा मुख्य कार्यक्रम गांधीपुतळा चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय स्वागत गेट, संपूर्ण महोत्सव मार्गाची सजावट, मारबतचे स्वागत आणि स्वागत मंच यांसह विविध व्यवस्था मनपाकडून करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती
विविध मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनपाने दिली.

याशिवाय फ्रान्स, इटली, फिनलंड आणि नॉर्वे या देशांचे वाणिज्यदूत (Consul General) तसेच विविध देशांचे प्रतिनिधी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, जय मेहता, अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

    नेहरू पुतळा चौक परिसरात परदेशी मान्यवरांना मारबत मिरवणूक पाहता यावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूसीएनवर करण्यात येणार आहे.

    १० आणि ११ सप्टेंबरला ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शन
    मारबत महोत्सवाचा इतिहास आणि जुन्या आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मनपातर्फे १० आणि ११ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या तळमजल्यावरील प्रदर्शन हॉलमध्ये ऐतिहासिक छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    हे प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. ‘ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लब’चे गजानन रानडे यांच्या संयोजनातून या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

    नागरिकांकडे असलेली मारबतची जुनी आणि ऐतिहासिक छायाचित्रे स्पर्धेसाठी ocpc.ngp@gmail.com या ई-मेलवर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

    ‘प्लास्टिकमुक्त नागपूर’साठी विद्यार्थ्यांचा सहभाग
    महोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. ‘प्लास्टिकमुक्त नागपूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मनपाच्या तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्लास्टिक संकलनाचे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

    नागपूरच्या १४५ वर्षांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि महोत्सवाचा उत्साह वाढवावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.