जेएनएन, नागपूर: महाराष्ट्राला समृध्द असा ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे.शहरातील मध्यवर्ती संग्रहालयात 7 फेब्रुवारी पासून शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटीशांच्या ताब्यात असलेली वाघनखे हे खास या प्रदर्शनाचे आकर्षण असून यासमवेत शिवशस्त्र नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या प्रस्तावित समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज सुरेश भट सभागृह येथे भेट देऊन पाहणी केली.

मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र हॉल उभारण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच वेळी सूमारे 50 लोकांना प्रदर्शनाची  पाहणी करता येईल. त्यानुसार गटाने प्रवेश व्यवस्था असेल. वाघनखे व शिवशस्त्रासह खुले शिल्पदालन, शिलालेख दालन पाहता येईल. खुलेशिल्प दालनामध्ये मध्य भारतातील आढळून आलेली इसवीसन पूर्व ते मध्ययुगीन काळापर्यंतची विविध  मुर्तीशिल्पे प्रदर्शित करण्यात आली आहेत. शिवकालीन शस्त्र दालनामध्ये वाघनखे, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा, अग्नीबाण आदी महत्वपूर्ण शस्त्रास्त्र पाहता येतील. अग्नीबाण हा राज्याच्या केवळ नागपूर येथील संग्रहालयात उपलब्ध आहे. या ठिकाणी विविध मर्दानी खेळ व शिवकालीन शस्त्रांची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. मुख्य समारंभ हा संग्रहालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर सुरेश भट सभागृहात संपन्न होईल.

शिवकालीन इतिहास हा श्रध्देसमवेत प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे  जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणातील ही महत्वाची टप्पे असून एक प्रकारे ही आपली सांस्कृतिक, ऐतिहासिक शक्तीस्थळ आहेत. या ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभवाला सातत्याने समाजापर्यंत पोहचविण्याची नितांत गरज असून यातून सामाजिक शांतता व स्वास्थ्य अधिक दृढ होते. राज्यात सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई येथे वाघनख्यांसह हे शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन आपण याच उद्देशाने आयोजित केल्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले.