जेएनएन, नागपूर:  मराठी साहित्य आणि काव्य-विनोदाच्या खास परंपरेला समृद्ध करणारे ज्येष्ठ कवी, वक्ते आणि ‘हास्यसम्राट’ म्हणून राज्यभरात ख्याती मिळवलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज पहाटे अमरावती येथे निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते आणि अमरावतीमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

डॉ. मिर्झा यांचे विडंबन, ग्रामीण बोलीचा वापर, हलक्याफुलक्या शैलीतून केलेले सामाजिक निरीक्षण आणि प्रभावी सादरीकरण यामुळे त्यांचे नाव साहित्यप्रेमी, कवी-प्रेमी आणि सर्वसामान्य श्रोत्यांत प्रचंड लोकप्रिय झाले. ‘मिर्झा एक्सप्रेस’ हा त्यांचा खास काव्यप्रयोग तर घराघरात पोहोचला आणि हजारो मैफलींमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले.

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज–माणिकवाडा या गावातून आलेल्या डॉ. मिर्झांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण जीवनाची माती, त्यातील रचना आणि विनोदाचे नैसर्गिक स्वरुप जपले. “सातवा महिना”, “उठ आता गणपत”, “जांगडबुत्ता” यांसारख्या त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांना अक्षरशः मोहून टाकले. ‘जांगडबुत्ता’ हा शब्द त्यांच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनला. त्यांनी आजवर 20 पेक्षा जास्त काव्यसंग्रह प्रकाशित केले आणि सुमारे 6 हजारांहून अधिक काव्यमैफलीत सहभाग नोंदवला. त्यांची विनोदी शैली, तिखट पण सभ्य भाष्य आणि जीवनाकडे पाहण्याचा अनोखा दृष्टिकोन मराठी साहित्यविश्वात वेगळा ठसा उमटवून गेला.

अमरावतीतील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या निवासस्थानी ते राहात होते. त्यांच्या मागे पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता पुत्र रमीज, तसेच दोन्ही कन्या — महाजबी आणि हुमा — असा परिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज दुपारी ईदगाह कब्रस्तानात होणार आहे.

त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. प्रमुख राजकीय नेत्यांसह अनेक कवी आणि कलाकारांनी त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.