जेएनएन, नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावातील शेतकरी अरुणाबाई बालपांडे आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामही केला. त्यांच्या या संवेदनशील आणि आपुलकीच्या कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीचे मनापासून कौतुक केले. फडणवीस यांनी लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि अरुणाबाई व रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला, ही बाब मनाला स्पर्श करणारी असल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांचे नुकसान, आर्थिक विवंचना आणि मुलांच्या शिक्षणासंबंधीच्या चिंता जाणून घेतल्या. दिवाळीच्या आनंदोत्सवातही शेतकरी संकटांचा सामना करत असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. "साहेब, तुम्ही थेट आमच्या गावात आलात, आमच्या सुख-दुःखात सहभागी झालात, यातच आमचे अर्धे दुःख हलके झाले," अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता आले, हीच माझ्यासाठी खरी दिवाळी!" शेतकऱ्यांचे पीक हे केवळ उत्पादन नसून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या वर्षभरातील कष्टांचे, त्यागाचे आणि स्वप्नांचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ मंत्रालयातील बैठका आणि आर्थिक मदतीपुरत्या मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर जाऊन समजून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता आले, हीच माझ्यासाठी खरी दिवाळी! हेमाडपंथी शिवमंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि कार नदीमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य अशा वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावी आज शेतकरी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाचे दुःख, त्याच्या व्यथा आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता जाणून घेताना मन भरून आले. आज मी येथील शेतकरी अरुणाबाई बालपांडे आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी आहे. बालपांडे कुटुंबाने अत्यंत आपुलकीने केलेल्या स्वागताने मन अक्षरशः भारावून गेले आहे. त्यांच्या प्रेमात, जिव्हाळ्यात आणि आपलेपणात एक विलक्षण भावनिक ओलावा आहे. देशभरात दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे करपलेली पिके, निर्माण झालेली आर्थिक विवंचना, मुलांच्या शिक्षणाची चिंता त्यांच्या मनात आहे. लोहारी सावंगा येथील शेतकऱ्यांशी या विषयांवर संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू निवळताना अनुभवला. "साहेब, तुम्ही थेट आमच्या गावात आलात, आमच्या सुख-दुःखात सहभागी झालात, यातच आमचे अर्धे दुःख हलके झाले," हे त्यांचे शब्द मनाला स्पर्शून गेले. माझ्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचे पीक म्हणजे केवळ उत्पादन नाही, तर ते त्याच्या संपूर्ण कुटुंबाने वर्षभर केलेल्या कष्टांचे, त्यागाचे आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. प्रत्येक पिकामागे कुटुंबाच्या भविष्याची आशा असते आणि प्रत्येक हंगामामागे समृद्धीचे स्वप्न असते. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे जेव्हा पीक उद्ध्वस्त होते तेव्हा शेतकऱ्यांच्या भविष्यावरही संकट येते. आज हे दुःख जवळून अनुभवले. म्हणूनच, केवळ मंत्रालयातील बैठका, निर्णय, योजना किंवा आर्थिक सहाय्यापुरते मर्यादित न राहता, बळीराजाच्या शेजारी बसून त्याच्या अडचणी जाणून घेणे, त्याचे अश्रू पुसणे आणि त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आधाराचा हात देणे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. रब्बी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य असेल त्या ठिकाणी विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल. काटोल आणि नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, निर्यातीसमोरील नव्या आंतरराष्ट्रीय आव्हानांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून संत्री आणि मोसंबीवर प्रक्रिया करण्यासाठी मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. आशिष देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. @cbawankule @AshishRDeshmukh #Maharashtra #DiwaliWithFarmers #Nagpur
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 7, 2026
दरम्यान, रब्बी पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शक्य असेल त्या ठिकाणी विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्याबाबत त्यांनी भूमिका मांडली. तसेच काटोल आणि नरखेड परिसरातील संत्री व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसमोरील आंतरराष्ट्रीय आव्हानांमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन नागपूरच्या मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून संत्री आणि मोसंबी प्रक्रिया उद्योग उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. या दौऱ्यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
