जेएनएन, नागपूर: सर्वसामान्यांची हक्काची लालपरी आणि ग्रामीण भागातील माता-भगिनींसह लाखो प्रवाशांच्या प्रवासाचे विश्वासार्ह साधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भंडारा जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या अंधारात प्रवासादरम्यान एसटी बसमधून खाली उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेची माध्यमांनी दखल घेतल्यानंतर एसटी महामंडळाने संबंधित बसचालक आणि वाहकाविरोधात कारवाई केली असून, दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडूनच अशा प्रकारचे वर्तन झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरवण्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वाहतुकीची मर्यादित साधने उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत मुलींना अर्ध्या रस्त्यात सोडणे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
या घटनेची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित चालक आणि वाहकावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एसटी प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देणे ही कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र, कर्तव्यात कसूर करून प्रवाशांना अडचणीत टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, अशी भूमिका परिवहनमंत्र्यांनी घेतली आहे.
