जेएनएन, नागपूर : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी 69 वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026-27 यंदा नागपुरात रंगणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या 20 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत सरदार वल्लभभाई पटेल (कच्छी विसा) मैदानावर कुस्तीचा हा महासंग्राम रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यातील 42 शहर व जिल्हा कुस्तीगीर संघांचे सुमारे 1300 मल्ल सहभागी होणार असून, खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि पदाधिकाऱ्यांसह जवळपास 1700 जणांची उपस्थिती अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

20 ते 24 जानेवारीदरम्यान रंगणार कुस्तीचा थरार
नागपूर महानगरपालिकेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही प्रतिष्ठेची स्पर्धा नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि कुस्तीच्या परंपरेला चालना देणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि माजी आमदार संदीप जोशी यांनी ही स्पर्धा नागपुरात आयोजित करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे केली होती. त्यानुसार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून नागपुरातील आयोजनाला अधिकृत मान्यता देण्यात आली.

42 जिल्हा संघांचे 1300 मल्ल घेणार सहभाग
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न असलेल्या 42 शहर व जिल्हा कुस्तीगीर संघांचा सहभाग असेल. प्रत्येक संघातून गादी प्रकारातील 10 वजनगट आणि माती प्रकारातील 10 वजनगटांमध्ये प्रत्येकी एक खेळाडू सहभागी होणार आहे.

या स्पर्धेत गादी आणि माती अशा दोन्ही प्रकारांत मिळून सुमारे 1300 कुस्तीपटू आपले कौशल्य पणाला लावतील. याशिवाय प्रत्येक संघासोबत दोन मार्गदर्शक आणि एक व्यवस्थापक असे एकूण 126 मार्गदर्शक व व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.

    स्पर्धेच्या तांत्रिक नियोजनासाठी प्रथम श्रेणी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड यांची स्पर्धाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 125 तांत्रिक अधिकारी आणि 25 पदाधिकारी या स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एकूण उपस्थितीचा आकडा जवळपास 1700 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्र केसरी किताबासाठी नामांकित मल्लांची लढत
    महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावण्यासाठी यंदा राज्यातील अनेक नामांकित कुस्तीपटू मैदानात उतरणार आहेत. मागील महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि पृथ्वीराज मोहोळ हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

    त्यांच्यासोबत उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, प्रकाश बनकर, जय पाटील, सिकंदर शेख आणि विराज चव्हाण यांसारखे नामांकित मल्लही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोण बाजी मारणार, याकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

    गादी आणि माती प्रकारात रंगणार अजिंक्यपदाची स्पर्धा
    या स्पर्धेत वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय गादी आणि माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. दोन्ही प्रकारांतील विविध वजनगटांमध्ये कुस्तीपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

    या लढतींमधून राज्यातील उत्कृष्ट कुस्तीपटूंची गुणवत्ता समोर येणार असून, महाराष्ट्र केसरी किताबासाठी होणाऱ्या अंतिम लढती विशेष आकर्षण ठरणार आहेत. राज्यातील विविध भागांतील नामांकित मल्ल एकाच मैदानावर उतरणार असल्याने नागपूरमध्ये कुस्तीचा मोठा थरार अनुभवायला मिळणार आहे.

    तरुणांना नशामुक्तीचा संदेश 
    केवळ क्रीडा स्पर्धा आयोजित करणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, तरुणांमध्ये व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे. कुस्तीच्या माध्यमातून तरुणांना नशामुक्ती आणि शारीरिक सौष्ठवाचा संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

    विदर्भाच्या कुस्ती क्षेत्राला मिळणार नवी ऊर्जा
    विदर्भाला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन नागपुरात होणे ही संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

    राज्यभरातील नामांकित मल्ल, प्रशिक्षक आणि कुस्तीप्रेमी नागपुरात दाखल होणार असल्याने शहरात क्रीडामय वातावरण निर्माण होईल. या स्पर्धेमुळे विदर्भातील नवोदित कुस्तीपटूंना राज्यातील दिग्गज मल्लांचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळेल. तसेच स्थानिक कुस्ती क्षेत्राला नवे प्रोत्साहन आणि व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा आहे.