जेएनएन, मुंबई: राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम संकटात आहे. विशेषतः मराठवाडा आणि सोलापूरसह दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागांत उभी पिके करपू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात, शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. 

तरुण शेतकऱ्याने  मांडली व्यथा
पाहणीदरम्यान एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. पाऊस पडत नाही, पाणी उपलब्ध नाही आणि शेतीचे उत्पन्नही होत नसल्याने जीवनच अडचणीत आले आहे. या परिस्थितीमुळे लग्नही होत नसल्याची खंत या तरुणाने व्यक्त केली. दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक जीवनावरही होत असल्याचे या प्रसंगातून समोर आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा दिसत असल्या तरी त्यामध्ये दाणे भरलेले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

पंचनामा कायद्याची प्रक्रिया; मदत मात्र सरसकट’
शेतकऱ्यांना दिलासा देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची भूमिका स्पष्ट केली. नुकसानाचे पंचनामे केले जात आहेत. कायद्यानुसार पंचनामा करण्याची प्रक्रिया आवश्यक आहे; मात्र नुकसान मोठ्या प्रमाणावर आणि सरसकट असल्याने मदतही सरसकट देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

“संकटात तुम्ही एकटे नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा विश्वासही फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला. दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या पाणी, अन्नधान्य आणि चाऱ्याच्या समस्यांवर सरकारकडून तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. 

दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर
राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा फडणवीस यांनी केली. 1972 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती पाहायला  दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांसमोर ढसाढसा रडू लागले शेतकरी; 2 दिवसात दुष्काळ जाहीर करणार - देवेंद्र फडणवीसांची ग्वाही