जेएनएन, मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर निश्चित झाल्यानंतर आता पालिकेच्या कारभारातील अत्यंत महत्त्वाच्या समित्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर, दोन्ही पक्षांतील सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर समोर आला आहे.
पालिकेच्या प्रशासनावर थेट प्रभाव टाकणाऱ्या चार महत्त्वाच्या समित्यांचे वाटप दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये करण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती (Standing Committee) भाजपकडे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. स्थायी समितीसोबतच शिक्षण समिती देखील भाजपकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.आर्थिक निर्णय, विकासकामांचा निधी आणि शिक्षणाशी संबंधित धोरणांवर भाजपचा प्रभाव राहणार आहे.
दरम्यान, सुधार समिती तसेच मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या बेस्ट समिती (BEST Committee) या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे समजते. बेस्ट समितीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक, वीजपुरवठा आणि संबंधित सेवांवर शिंदे सेनेचा निर्णायक सहभाग राहणार आहे.
माहितीनुसार, येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत उर्वरित महत्त्वाच्या समित्यांचे औपचारिक वाटप पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर प्रभाग समित्यांसह इतर लहान-मोठ्या समित्यांचे वाटप पुढील दोन ते तीन आठवड्यांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे.
महापौर निवडीनंतर समित्यांच्या वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सत्तावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झाल्याने मुंबई महानगरपालिकेतील प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वास सत्ताधारी पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: Pune Mayor: पुण्याच्या महापौर-उपमहापौरपदासाठी आज निवडणूक; भाजपाकडे बहुमत
