जेएनएन, मुंबई. Local Body Election 2025, Mumbai Municipal Corporation Elections: आगामी महानगर पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू महाविकास आघाडीशिवाय लढणार असल्याचे संकेत दिले आहे.उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने मनसेसोबत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला तयार केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एकूण 227 पैकी तब्बल 157 जागा शिवसेना (ठाकरे गट) लढवणार असून 70 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) देण्याची तयारी आहे.महापालिका निवडणूक जवळ येत असताना दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या गाठी अधिक वेगाने बसताना दिसत आहेत.
मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांत मनसेला प्रत्येकी दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठाकरे गटाने दिला आहे. या जागांमध्ये मनसेचा स्थानिक प्रभाव, तसेच मागील निवडणुकांतील कामगिरी यांचा विचार करून गणित मांडण्यात आले असल्याची माहिती आहे. हा फॉर्म्युला अमलात आल्यास, मुंबईमध्ये मनसेला तब्बल 70 प्रभागांत लढण्याची संधी मिळणार आहे.
मात्र, काही महत्त्वाच्या आणि मनसेच्या प्रभाव असलेल्या मतदारसंघांत या पक्षाने 3 जागांची मागणी केली आहे.यावर अजूनही दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. विशेषतः मध्य मुंबई, परळ, दादर आणि घाटकोपर परिसरात मनसे आपला वाटा वाढवण्याच्या तयारीत आहे. मनसेने मागणी केलेल्या अतिरिक्त जागांवर ठाकरे गटाचा सकारात्मक प्रतिसाद मिळणार काय हे पुढील दोन–तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
मुंबई महापालिकेवरील सत्ता परत मिळवण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे, तर मनसेलाही या निवडणुकीत मजबूत पुनरागमनाची संधी दिसत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचा हा संभाव्य समझोता मुंबईतील राजकारणाला नवीन वळण देऊ शकतो. पुढील बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
