जेएनएन, मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढत आहे. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून, मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. तर 22 पुणेकर थोडक्यात हल्ल्यातून वाचले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक राउंड गोळीबार केला. जखमींमध्ये पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचा समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये 2 जण महाराष्ट्रातील पर्यटक असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, दिलीप डिसले, अतुल मोने अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमधील एक जण पनवेलचे असून, उर्वरित 1 जण महाराष्ट्रातील कोणत्या भागातील आहे याचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. जखमींची काश्मीर प्रशासनाने कळविलेली नावे माणिक पटेल (पनवेल), एस. भालचंद्रराव अशी असून सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातून गेलेले पर्यटक आज परत येणार आहेत. विजय पारगे यांच्यासह पुण्यातील एकूण 22 जणांचा ग्रुप या हल्ल्याआधीच पहलगाममधून बाहेर पडला होता. त्यामुळे हे 22 जण या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.
पुण्यातील दोन प्रवाशांचा मृत्यू
पुण्यातील जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीय हे काश्मीरला फिरायला गेले होते. हे पाच जण पहलगाममध्ये असताना त्यांच्यावर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी जगदाळे आणि गणबोटे कुटुंबातील पुरुषांना धर्म विचारला आणि त्यानंतर गोळी घातली. यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
जम्मू-काश्मीरमध्ये बंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना आदर आणि एकता दर्शवण्यासाठी, खाजगी शाळा संघटना जम्मू आणि काश्मीरने काश्मीर खोऱ्यातील शैक्षणिक संस्था आज बंद राहतील, अशी घोषणा केली आहे.
हे सुद्धा वाचा: 'धर्म विचारून कलमा वाचायला लावला, नाही जमलं तर गोळ्या घातल्या!; बळी पडलेल्या पुण्यातील व्यावसायिकाच्या मुलीने सांगितली दहशतवाद्यांची थरारक कहाणी
ओडिशामधील प्रशांत कुमार सातपते यांचा हल्ल्यात मृत्यू
ओडिशामधील प्रशांत कुमार सातपते यांचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत पर्यटनासाठी गेले होते. 41 वर्षीय प्रशांत हे बालासोर जिल्ह्यातील सारंग पंचायतमधील असानी गावातील रहिवासी होते. त्यांची पत्नी प्रियदर्शनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी प्रशांत यांच्या डोक्यात गोळी झाडली. 'त्यानंतर माझे पती माझ्यासमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडले,' असा थरारक अनुभव प्रियदर्शनी यांनी सांगितला.