विनोद राठोड, मुंबई: Farmer Loan Waiver News: राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात, हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ' असे विधान करून शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे. कर्जमाफीचे आश्वासन देताना भाजपाने समिती स्थापन करण्याची भाषा केली नव्हती. शेतकरी हा गरजूच आहे, कसलाही भेदभाव न करता त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. भाजपा युती सरकार अदानीसाठी सर्व नियम बदलते, त्यांना सुविधा दिल्या जातात, तर मग शेतकऱ्यांसाठीच नियम व अटी कशाला लावता? भाजपा सरकार शेतकरीविरोधी आहे, भाजपाच्या धोरणामुळेच शेतकरी पिचला आहे. निवडणुकीवेळी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले, पण आता मात्र कर्जमाफी देण्यावरून सत्ताधारी पक्षातील नेते पळ काढत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

काँग्रेसप्रणित यूपीए सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी ऐतिहासिक अशी 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. महाविकास आघाडी सरकारनेही कोणतेही नियम, अटी न घालता सरसकट कर्जमाफी दिली होती. शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची दानत काँग्रेस सरकारने नेहमीच दाखवली आहे, परंतु भाजपा मात्र शेतकरीविरोधी आहे. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला 3 हजार कोटी रुपयांचे वाढीव कंत्राट देताना सरकारकडे पैसे असतात, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी मात्र नसतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्याला कर्जाच्या जोखडातून मुक्त करावे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. 'गरजू शेतकरी' अशी वर्गवारी करणे हा शेतकऱ्यांचा अपमान असून, सरकारने निवडणूक आश्वासनापासून पळ काढू नये, असे ते म्हणाले. अदानी आणि कंत्राटदारांना सवलती देणाऱ्या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे का नाहीत, असा सवाल करत त्यांनी यूपीए आणि मविआ सरकारच्या काळातील कर्जमाफीची आठवण करून दिली.