जेएनएन, मुंबई. Mumbai–Pune Expressway: पुणे एक्सप्रेसवेवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पनवेल एक्झिट उद्यापासून सहा महिने बंद राहणार आहे. यामुळे लहान आणि मोठी वाहने तसेच मालवाहू ट्रक वाहतूकीवर मोठा परिणाम होणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिने बंद राहणार आहे. या निर्णयामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना प्रवास करत असताना फटका बसणार आहे. कळंबोली जंक्शन येथे विकासकामे सुरू असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपासचे काम उद्यापासून सुरू करत आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग बंद झाल्याने पनवेल, मुंब्रा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या छोट्या वाहनांसह जड वाहतूकीच्या वाहनांचे मार्ग परिवर्तीत करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा आणि पळस्पे सर्कल मार्गे NH-48 वर परिवर्तीत करण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी व तलोजा, कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणारी वाहने रोडपाली आणि NH-48 मार्गाने जाणार आहेत.

प्रवाशांसाठी महत्वाच्या सूचना

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे प्रवास करत असतांना नवी मुंबई वाहतूक विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गातील ट्राफिक जाम टाळण्यासाठी वाहनचालकांना सुचवलेल्या मार्गांचे अनुसरण करण्याचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असा सल्ला वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी साइनबोर्ड आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. बांधकाम कामाच्या प्रगतीबद्दल प्रवाशांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी नियमित सूचना दिले जाणार आहेत.