जेएनएन, मुंबई. Mumbai MegaBlock News: उद्या मुंबई लोकलचा मेगाब्लॉक असणार आहे. रविवारच्या दिवशी फिरण्याचा विचार असेल तर रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घरातून बाहेर पडावे. मेगाब्लॉकमुळे रेल्वेने अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. विशेषत: रविवारच्या दिवशी लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. सुधारित वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे असे आवाहन रेल्वे विभागाकडून प्रवाशांना केले आहे. मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला जात आहे. यासाठी सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेतला जात आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक सुरू राहणार आहे.

कसा असेल मेगाब्लॉक?

मेगाब्लॉकच्या दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल, जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या वेळेत धावणाऱ्या सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबणार आहेत. यापुढील स्थानकावर लोकल सेवा जुन्याच धीम्या मार्गावर धावणार आहे.

हार्बर लाईन मार्ग -

हार्बर  लाईन  वर मेगाब्लॉकचा सर्वाधिक परिणाम दिसणार आहे. कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी – पनवेल, बेलापूर, वाशीच्या अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांसाठी सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी मार्गांवर काही विशेष लोकलच धावणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवासी ठाणे – वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ब्लॉक काळात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रेल्वे सेवा सुरू असणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

वेस्टर्न रेल्वे लाईन

    वेस्टर्न रेल्वे लाईनवर बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत गोरेगाव – बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावणार आहेत.