जेएनएन, मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनलेल्या अंतरवाली सराटी गावातून एक महत्त्वाची बातमी आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यापुढे अंतरवाली सराटी येथे उपोषण आंदोलन न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांच्या नेहमीच्या उपोषणस्थळावरील मंडप आणि स्टेज हटवण्यात आले आहेत. तसेच स्टेजवर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही अन्य ठिकाणी हलवण्यात आला आहे.
उपोषणस्थळी सध्या केवळ पत्र्याचे शेड कायम ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी मंडप आणि स्टेज कायमस्वरूपी उभारण्यात आले होते. मात्र, यापुढे गावात कोणतेही उपोषण किंवा आंदोलन न करण्याचा निर्णय निश्चित झाल्यानंतर जरांगे यांच्या सांगण्यावरूनच मंडप आणि स्टेज हटवण्यात आल्याची माहिती आहे.
2023 पासून अंतरवाली ठरलं आंदोलनाचं केंद्र
मनोज जरांगे पाटील यांनी 2023 पासून अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात केली. या ठिकाणी त्यांनी अनेकदा आमरण उपोषण केले. त्यांच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले.
उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव निर्माण करत जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्या आंदोलनांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि अंतरवाली सराटी येथे अनेकदा मोठ्या संख्येने समर्थक जमा झाले होते .
आता आंदोलनाचे पुढील केंद्र कुठे?
अंतरवाली सराटीतील मंडप आणि स्टेज हटवण्यात आल्याने जरांगे यांच्या आंदोलनाच्या पुढील भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. यापुढे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन किंवा उपोषणाची गरज भासल्यास ते नेमके कुठे केले जाणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे यापुढे उपोषण किंवा आंदोलन न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असली, तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
