जेएनएन, मुंबई: सेंटर, स्टार्टअप, इनोव्हेशन व गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत आहे. तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, फिनटेक या क्षेत्रातील गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे आवडते गुंतवणुकीचे ठिकाण झाले आहे. नवी मुंबई परिसरात इनोव्हेशन सिटी उभारण्यात येत असून वसई, विरार, पालघर परिसरात चौथी मुंबई निर्माण होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अमेरिका व भारतातील उद्योग वाढीमध्ये यु.एस. इंडिया बिझनेस कौन्सिल (यूएसआयबीसी)चे मोठे योगदान आहे. दोन्ही देशातील उद्योगांमधील सहकार्यासाठी अर्थपूर्ण व औपचारिक भूमिका कौन्सिल पार पाडत आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचे गुंतवणुकीचे स्थान आहे. भारतातील अनेक उद्योजक अमेरिकेत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, तसेच अमेरिकेतीलही अनेक गुतंवणूकदार भारतात येण्यास उत्सुक आहेत.
सर्वाधिक गुंतवणुक महाराष्ट्रत
देशातील सर्वाधिक गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा अव्वल स्थानावर असून देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने स्वतःचाच विक्रम मोडला असून परदेशी गुंतवणूकदारांचे हे आवडते ठिकाण झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हे स्टार्टअपची राजधानी म्हणून ओळखले जात आहे. स्टार्टअपमधील गुंतवणूक व स्टार्टअप कंपन्यांमध्येही महाराष्ट्र अव्वल असल्याचे एका अहवालात नमूद केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आर्थिक, व्यापार, नाविन्यता यामधील गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र हे उद्योग जगताचे आवडते ठिकाण झाले आहे. अटल सेतू व नवी मुंबई विमानतळामुळे त्या परिसराचा कायापालट होत असून नवी मुंबईत विशिष्ट संकल्पनेवर आधारित नाविन्यता शहरे उभारण्यात येत आहेत. नाविन्यता, शिक्षणाशी संबंधित इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या परिसरात परदेशातील जागतिक क्रमवारीतील पहिल्या पन्नासमधील 5 विद्यापीठे येणार असून त्यातील तीन विद्यापीठे ही अमेरिकेतील आहेत. त्यामुळे नवी मुंबई हे एक एज्युसिटी म्हणून ओळखले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डेटा सेंटरला पुरविणार हरित ऊर्जा
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक होत आहे. देशातील 65 टक्के डेटा सेंटर येथे आहेत. त्यामुळे राज्याला आता डेटा सेंटरचे कॅपिटल म्हणूनही ओळखले जात आहे. या डेटा सेंटरला पुढील 2023 पर्यंत हरित ऊर्जा पुरविण्यात येणार आहे. पालघरजवळ देशातील सर्वात मोठे वाढवण बंदर उभारण्यात येत आहे. जेएनपीटीपेक्षाही तीन पट मोठे हे बंदर असून या बंदराला बुलेट ट्रेन, मल्टिमॉडेल कॉरिडॉरने जोडले जाणार आहे. तसेच महामुंबईतील तिसऱे विमानतळही उभारण्यात येत आहे. पायाभूत सुविधा व गुंतवणुकीमुळे हा परिसर चौथी मुंबई म्हणून विकसित होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
गडचिरोली जिल्हा स्टिल हब
पूर्वी माओवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला गडचिरोली जिल्हा आता देशाचे स्टिल हब म्हणून ओळखला जाणार आहे. या परिसरात स्टिल उद्योगामध्ये सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक होत आहे. पुणे हे उत्पादन उद्योगांचे शहर आहेच. त्याचबरोबर आता छत्रपती संभाजीनगरमधील दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे हा परिसर ईलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनला आहे. त्यासाठीची संपूर्ण व्यवस्था या परिसरात तयार केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वेव्ज परिषदेत सहभागी होण्याचे अमेरिकन गुंतवणुकदारांना आमंत्रण
जागतिक मनोरंजन परिषदेचे (ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट-वेव्ज 2025) आयोजन करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही परिषद यंदा मुंबईत होणार असून या परिषदेसाठी अमेरिकेतील उद्योजक, गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे, असे निमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला, सृजनशीलता आणि प्रतिभा दाखविण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा:Politcs: चार जागांवरून तुटली होती भाजप-शिवसेनेची युती, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली 2014 ची गोष्ट
हेही वाचा:'फक्त हिंदी' म्हणणाऱ्या तरुणाला मनसेचा चोप!