जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. राजकीय पक्ष सभा आणि रोड शो जोरदार करत मतदाराला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 14 नोव्हेंबरला महाराष्ट्रात तीन सभांचे आयोजन केले आहे. पीएम मोदींची सभा मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित केली आहे. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असल्याने या सभेला विशेष महत्त्व आहे, तर दुसरी सभा नवी मुंबई आणि तिसरी सभा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली आहे. पंतप्रधान महायुतीचा प्रचार करत कोकण आणि मराठवाडा भागातील लोकांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाजी पार्कमधील पंतप्रधान यांच्या सभेची जय्यत तयारी भाजप-प्रणीत महायुतीने सुरू केली आहे. शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी शिवसेना उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडतो. याच मेळाव्यातून उद्धव ठाकरे भाजप आणि पंतप्रधानावर आरोप करतात. 14 नोव्हेंबर रोजी मोदी उद्धव ठाकरेंवर नेमका काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.