जेएनएन, मुंबई: मुंबई, नागपूर, पुणे या महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो मार्गांचे जाळे विस्तारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
सध्या मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत, ज्याचा सुमारे 10 लाख प्रवासी दररोज लाभ घेत आहेत. अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या माहितीनुसार, येत्या वर्षभरात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, तर पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. तसेच, पुढील पाच वर्षांत एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील 43.80 किलोमीटर लांबीचे काम 6 हजार 708 कोटी रुपयांच्या खर्चातून प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग आणि पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-2 अंतर्गत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांचा 9 हजार 897 कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे या शहरांमधील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.