जेएनएन, मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक पोलीस चौकी समोरील अनधिकृत झोपडपट्टीला आज पहाटे भीषण आगीची घटना घडली. शहरातील एका झोपडपट्टी भागात अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांत विक्राळ रूप धारण केलं.

आगीदरम्यान एकापाठोपाठ एक सिलिंडर स्फोट झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. या भीषण दुर्घटनेत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास झोपड्यांमधून धूर निघताना दिसला आणि काही मिनिटांतच आगीने संपूर्ण वस्तीत फैलाव केला. झोपड्या एकमेकांना लागून असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. याचदरम्यान घरगुती गॅस सिलिंडरचे स्फोट होऊ लागल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली.

स्थानिक नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी आर्त धावाधाव केली. अनेकांनी घरातील सामान तसंच सोडून बाहेर पळ काढला. काही जण आगीत अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी आणि बचाव पथकांनी जीवाचं रान केलं.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, पाण्याचे टँकर आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून काही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून शॉर्टसर्किट किंवा गॅस गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा: Mathura Boat Accident: यमुनेत नाव पलटल्याने पंजाबमधील 10 भाविकांचा मृत्यू; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना