जेएनएन, मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीला वेग आला असून मतदार यादी प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. यासोबतच सर्वाधिक दिलासा देणारा निर्णय म्हणजे हरकत किंवा सूचना नोंदवताना नागरिकांना कोणताही पुरावा जोडण्याची सक्ती राहणार नाही. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बीएमसीने मुख्यालयासह सर्व प्रभाग कार्यालयांत ‘मतदार सहायता केंद्रे’ सुरू केली आहेत.
निवडणूक प्रक्रियेत मतदार यादीतील चुका, नावातील त्रुटी, पत्त्यातील विसंगती किंवा नाव गाळल्यास नागरिकांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र या नव्या आदेशामुळे नागरिकांना थेट केंद्रावर जाऊन सूचना किंवा हरकती नोंदविण्याची मुभा मिळणार आहे. पुरावा न मागण्याचा निर्णय हा नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्राधिकृत अधिकारी आता प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची स्वत:हून दखल घेणार आहेत. प्रशासनिक यंत्रणेद्वारे शहानिशा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असून यामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह ठरण्याची अपेक्षा आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे हे या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे बीएमसीने स्पष्ट केले आहे.
मतदार सहायता केंद्रांमुळे नागरिकांना त्यांच्या प्रभागातच तक्रारी किंवा हरकती नोंदविणे सुलभ होणार आहे. आगामी बीएमसी निवडणुकीत मतदार यादीतील चुका टाळण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नागरिकांना योग्य माहिती मिळावी आणि त्यांच्या हक्काचे मतदान सुनिश्चित व्हावे यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
हेही वाचा: विदर्भात एकनाथ शिंदेंकडून प्रचारसभांचा धडाका; भद्रावती आणि वरोरा नगर परिषदा पुन्हा जिंकण्याचा निर्धार
