जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत विशेष प्रकल्पात 15 हजार युवकांना प्रशिक्षीत करण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागातर्फे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.
पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत युवांना कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यास पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल. राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल. कौशल्य विकास विभागाशी पर्यटन विभागाने समन्वय साधून प्रस्ताव तयार करण्यात यावा.
शासनाच्या मान्यतेनंतर प्रथम टप्प्यात राज्यात 15 हजार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याचा पर्यटन विभागाचा मानस आहे. पर्यटन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व रिसॉर्टसमधील अधिकारी व कर्मचारी यांना देखील प्रशिक्षण देण्यात येईल. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात पर्यटन कौशल्यमध्ये काम करणाऱ्या विविध संस्थाचा अभ्यास करून त्यांचे यासाठी सहकार्य घेण्यात यावे, असेही पर्यटन मंत्री देसाई म्हणाले.
हेही वाचा: 'बाथरुममध्ये बॉम्ब आहे.. ', नाशिकमधील शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ